स्वर्गलोकीची PhD – [भाग ६]

 

सकाळी निघण्यापूर्वी इंद्रदेवांनी आपला दरबार भरवला. ई. स. पू. २७०० नंतर (१९६९ चा मधुबालाचा अपवाद सोडल्यास ) पहिल्यांदाच दरबार भरला होता. भांबुर्डेकराशी वादविवाद  करताना लागणारे महत्वाचे पॉईंट्स, आपली बलस्थानं, त्याची कमकुवत बाजू इ. विषयांवर चर्चा करण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. एवढी तयारी करण्याची तशी काही विशेष आवश्यकता नव्हती. भांबुर्डेकर काही पुण्याचा नव्हता, पण पुण्याजवळच राहायला होता. त्यामुळे ‘वाण नाही पण गुण’ नक्कीच लागला असणार म्हणून इंद्रदेव इतकी सावधगिरी बाळगत होते.

सभा जवळ जवळ संपलीच होती. इंद्रदेवांनी पुन्हा एकदा सर्वांना उद्देशून विचारले, “कुणाला आणखीन काही सांगायचं आहे का?”

अग्नीदेव हात उंचावून म्हणाले, “व्हय महाराज.” अग्निदेव आज पहिल्यांदाच सभेत काहीतरी बोलण्यासाठी उभे राहिले होते. अग्निदेवांना काही बोलायचंय हे पाहून इंद्रदेव खुश झाले, सभेत सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे असा त्यांना वाटत होतं. “बोला अग्निदेव, काय सूचना आहे तुमची” – इंद्रदेव.

“देवा, ते तिकडं जोशी वडेवाले म्हणून लय फेमस हायेत. येताना सगळ्यांना दोन दोन वडेपाव आणा ना.”   ते ऐकून इंद्रदेवांचा चेहरा पडला. ते ओरडले, “अहो अग्निदेव तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का?…..म्हणे दोन – दोन वडेपाव आणा.” थोडा वेळ थांबून इंद्रदेवांनी विचार केला आणि हळूच म्हणाले “एक – एकच येईल प्रत्येकाच्या वाट्याला…….  तेवढेच पैसे आहेत माझ्याकडे.”

“बरं, आणखीन कुणाला ‘भांबुर्डेकराबद्दल’ काही सूचना द्यायच्या आहेत का?” – इंद्रदेव.

“मी काय म्हंतो म्हाराज” मांडी खाजवत वरून देव म्हणाले, “आपण त्रिशूळ व्ह्यू केला तर….. तो कुणालाच म्हाईत न्हाय, म्हंजे त्या भांबुर्डेकरला पण म्हाईत नसणार.”

“तुम्ही पहिलं ते बाहुबलीचं खुळ डोक्यातून काढा बघू… कशाला पाहिजे त्रिशूल व्यूह, मी काय त्याच्याशी युद्ध करायला चाललोय का? आणि तशी वेळ आलीच तर माझ्या वज्राचा एकच प्रहार खूप झाला” इंद्रदेव त्याच्यावर खेकसले.

“महाराज तेवढी वेळच येणार नाही. तुमचं दर्शन होताच त्याची बोबडी वळेल, तुमचे ऐश्वर्य पाहून त्याचे डोळे दिपून जातील. काय बोलावे ते त्याला सुचणार नाही. ‘माझ्या हातून चूक घडली’ असं म्हणून तुमचे पाय धरील तो.” चित्रगुप्तांच्या बोलण्याने  इंद्रदेवांना बराच धीर आला.     

images-2

आता सभा बरखास्त करायची वेळ आली होती. तत्पूर्वी इंद्रदेवांनी हजेरी घेतली. सूर्यदेव वगळता सर्व देव उपस्थित होते. एवढी महत्वाची सभा आणि सूर्यदेव गैरहजर??… इंद्रदेवांनी रागाने विचारले, “सूर्यदेव कुठे आहेत?”

“महाराज ते ‘उगवायला’ गेलेत.” – चित्रगुप्त

“तुमचं नेहमी हेच उत्तर कसं असतं चित्रगुप्त. सारखेच कसे उगवायला गेलेले असतात ते. दिवसाएक  ठीक आहे, पण रात्री काय काम असतं त्यांचं.”

“पण महाराज…. ते पृथ्वी गोल असती त्यामुळे…. ”  -चित्रगुप्त या प्रकरणावर अधिक माहिती पुरवणार तोच त्यांना तोडत इंद्रदेव गरजले. “पण नाही नि बिन नाही. त्यांना आजच्या आज मला भेटायला सांगा. आणि अंधार पडायच्या किमान तासभर आधी या म्हणावं….. संध्याकाळी मला नीट दिसत नाही.”

अखेर इंद्रदेवांनी सभा बरखास्त केली. सर्व आयुधं घेऊन ते निघाले, जाताना खासगीत त्यांनी पुन्हा एकदा वरूण देवांना झापले. ऐरावतावर स्वार होण्यापूर्वी ते एकदा थांबले आणि फिरून वरुण देवांना म्हणाले, “मी आल्या शिवाय ‘सैराट’ ची CD उघडू नका.”

“होय देवा.” सगळेजण एकसुरात म्हणाले.  इंद्रदेव जाताच सर्व देव ‘सैराट’ बघायला पळाले.

 

क्रमश:

 

<<< मागील भाग            [ भाग १ ]

स्वर्गलोकीची PhD – [भाग ५]

“काय? तो पुण्याचा नाहीये?” आनंदाने टुणकन उडी मारत इंद्रदेव म्हणाले, “मग त्याला धडा शिकवण्यात काहीच अवघड नाहीये.”

आपली (गंजलेली) तलवार म्यानात सरकावत इंद्रदेव ओरडले, “कोण आहे रे तिकडे? पवनदेवांना आम्ही येत असल्याची वर्दी द्या. त्यांना, आमच्या मर्त्यभूमी वरील स्वारीची सर्व तयारी करायला सांगा. आम्ही उद्याच प्रस्थान करणार आहोत.”

तलवार कंबरेला अडकवून झाली, तरी अजून कोणीच ‘ओ’ दिली नाही. त्या दोघांसमोर आपला ‘पचका’ नको म्हणून इंद्रदेव पुन्हा ओरडले, “कोण आहे रे तिकडे? पवनदेवांना आम्ही येत असल्याची वर्दी द्या.”

पाच मिनिटे झाली तरी अजूनही कोणीच ‘ओ’ दिली नाही.  काकुळतीला येऊन इंद्रदेवांनी आणखीन एकदा प्रयत्न करून पहिला, ते ओरडले, “अरे कुणी आहे का रे तिकडे?” पण अजूनही काहीच प्रतिसाद नव्हता.

द्वारावरचा पहारेकरी अग्निदेवांबरोबर ‘तीन पत्ती’ खेळायला गेला होता. काहीच प्रतिसाद नाही हे पाहून प्रधानजींकडे वळत इंद्रवदेव हळूच म्हणाले, “प्रधानजी, तुम्ही या भांबुर्डेकराचा सगळा अहवाल बनवून माझ्याकडे पाठवून द्या. तो पर्यंत मी पवन देवांना निरोप देऊन येतो.”

इंद्रदेव निघून गेल्यावर प्रधानजी वहीतला तो कागद निरखून पाहू लागले. तोच एक कडक आवाज आला – “प्रधानजी”.  प्रधानजींनी दचकून दाराकडे पहिले. “इंद्रदेवांच्या आवाजात एवढा कडकपणा?”  पण दारात कोणीच नव्हते.

तो आवाज ‘जय मल्हार’ मालिकेतल्या खंडोबाचा होता हे लक्षात येताच कागद बाजूला फेकून त्यांनी T.V.चा आवाज वाढवला. आणि T.V. समोर बसकण मारली.

 

इंद्रदेव पवनदेवांच्या निवासस्थानी गेले. पवनदेव हॉलमध्ये सोफ्यावर बसले होते. पण पाहतो तर काय?? पवन देवांच्या डोळ्यातून घळा – घळा अश्रू वाहत होते.

इंद्रदेवांचा विश्वासच बसेना. “स्वर्गलोकातही कोणी दुःखी असू शकते? स्वर्गलोकातही अश्रू ढाळावेत अशी परिस्थिती असू शकते?” या विचारताच ते आत शिरले. तोच सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला.

पवनदेव एका हाताने अश्रू पुसत आणि नाकाने फुरफुर आवाज करत, कांदे चिरत बसले होते. समोर, ताटात चिरलेल्या कांद्याचा ढीग पाहता, त्यांची ही अवस्था होणे साहजिकच होते.

इंद्रदेवांना पाहताच पवन देव उठले आणि मुजरा करत म्हणाले, “या महाराज. आज कसे काय येणे केले?”
इंद्रदेवांचे लक्ष त्या कांद्याच्या ढिगाकडेच होते. ते म्हणाले, “पवनदेव काय आहे हे?”
“काय नाय महाराज? कुठून बुद्धी झाली आणि बायकोला कांदाभजी करायला सांगितली कोण जाणे?” चेहरा पाडून पवन देव म्हणाले.

थोड्या वेळासाठी इंद्रदेवांना त्यांची दया आली पण लगेचच स्वतःला सावरत ते म्हणाले, “आम्ही उद्या मर्त्यलोकी, त्या भांबुर्डेकराकडे जाणार आहोत, त्याचं विधान किती खोटं आहे हे त्याला दाखवून द्यायचं आहे आणि असं विधान केल्याबद्दल त्याला योग्य ती शिक्षा द्यायची आहे. जेणेकरून पुन्हा कोणी मानव असले धाडस करायला धजावणार नाही.”

कंबरेवर हात ठेवत आणि स्वतःशीच पुटपुटत ते पुढे म्हणाले, “देवालाही सगळं काही शक्य नाही म्हणतोय शहाणा.”

पुन्हा पवनदेवांकडे पाहत ते म्हणाले, “आजच सगळी तयारी करा. आमचा वज्र बाहेर काढा – ‘ऐरावत’, ‘मुकुट’, ‘तलवार’, ‘गदा’ आणि ‘अॅसिडिटीच्या गोळ्या’ सगळं तय्यार ठेवा. आम्ही उद्याच निघणार आहोत.”

 

 

क्रमश:

<<< मागील भाग                        [ भाग १ ]                        पुढील भाग >>>

 

स्वर्गलोकीची PhD – [भाग ४]

“काय?…. पुण्याचा?” पुण्याचं नाव ऐकताच इंद्रदेव डोक्याला हात लावून खालीच बसले.
पुणेकरांचा महिमा त्यांच्यापर्यंतही पोहोचलाच होता. whatsapp आणि fb वरच्या पुणेरी पाट्या आणि पुणेरी किस्से ते रोज वाचतच होते. त्यामुळे पुण्याचं नाव ऐकताच त्यांच्या छातीत धस्स झाले.

“होय पुण्याचा” चित्रगुप्त म्हणाले “आणि स्वयम भगवान विष्णूही रात्रं-दिवस याच गोष्टीवर विचार करत असतात.”

“कोणत्या?”  – इंद्रदेव

“पुणेकरांवर काय उपाय करावा याचा.”

“ही पुण्याची लोकं खूप आगाऊ असतात म्हणे”  – प्रधानजी.

“आगाऊ नव्हे……. स्वाभिमानी”  चित्रगुप्तानीं त्यांना करेक्ट केलं.

“अहो तेच ते…. म्हणजे सरळ भाषेत आगाऊच ना.”

“नाही तसं नाही म्हणता येणार……मुळात आगाऊ आणि स्वभिमानी यातला फरक समजावून घेतला पाहिजे. या दोघांना वेगळी करणारी रेषा खूपच अस्पष्ट आहे, त्यामुळे  खूप गैरसमज होतो. बेसिकली आधी या शब्दांची व्युत्पती कशी झाली हे समजावून घेतलं पाहिजे……… ते म्हणजे असं आहे कि  ज्यावेळेस भाषेची रचना झाली……  ” आपलं बोलणं व्यवस्थितपणे दोघांच्याही डोक्यावरून  जात आहे याची खात्री करून चित्रगुप्तांनी पुढे continue केले आणि पुढील ५ मिनिटे अगम्य अश्या भाषेत बरच काही बोलले. त्याचं बोलणं समजण्याची ताकत फक्त ब्रम्हा, विष्णु, शंकर आणि अस्सल पुणेकर यांच्यातच होती. भाषेच्या व्याकरणापासून सुरु करून – आदी मानव, ऋषीमुनी, शिवाजी महाराज, तुकाराम आणि पु.ल. ( via पेशवे) ही स्टेशनं घेऊन अखेर चित्रगुप्त थांबले.

चित्रगुप्त पुढे आणखीन काही बोलणार तोच इंद्रदेव म्हणाले, “तुम्ही पुण्याचे आहात का हो?”

“नाही. मी ५ वर्षांसाठी पुण्यात होतो.”

“अरे बापरे!” इंद्रदेव मनातच म्हणाले, ” हा फक्त ५ वर्षे पुण्यात राहिला तर ‘असा’ आहे. भाम्बुर्डेकर तर मूळचाच पुण्याचा आहे, मग तो ‘कसा’ असेल ?” इंद्रदेवांची छाती आणखीनच धडधडू लागली.

“हे पुणेकर खरच खूप कडक शिस्तीचे असतात का हो?” – प्रधानजी
“हो तर. नियम म्हणजे नियम.” चित्रगुप्त मान हलवत सांगू लागले  “आत्ता परवाचीच गोष्ट. एका ९५ वर्षाच्या म्हाताऱ्याचे प्राण घ्यायला यम सदाशिव पेठेत त्याच्या घरी गेला तर, ‘दुपारी दोन वाजता आमचा झोपायचा टाईम असतो, नंतर या’ असं म्हणून हाकलून लावलं म्हणे त्याला.”

“अरे बापरे.” इंद्रदेव आणखीन गंभीर मुद्रेत म्हणाले, “हा भाम्बुर्डेकरपण सदाशिव पेठेतच राहतो का?”

“नाही. खरतर तो  पुण्याचा नाहीये. पुण्याबाहेर तळेगाव दाभाडे नावाचं ठिकाण आहे, तिथे तो राहतो.”

“काय? तो पुण्याचा नाहीये?” आनंदाने टुणकन उडी मारत इंद्रदेव म्हणाले, “मग त्याला धडा शिकवण्यात काहीच अवघड नाहीये.”

 

क्रमशः

<<< मागील भाग         [ भाग १ ]              पुढील भाग >>>

स्वर्गलोकीची PhD – [भाग ३]

“पण महाराज ते खातं तर चित्रगुप्तांकडे आहे.” – प्रधानजी
“मग बोलावुन घ्या त्यांना.” – इंद्रदेव
प्रधानजींनी लागलीच चीत्रगुप्तांना फोन लावला.
“कोणाय?” पलीकडून कोणीतरी म्हातारा ओरडला. फोनवरचा तो तिरसट आवाज ऐकून इंद्रदेव पण दचकले. प्रधानजींनी त्यांना इंद्रदेवांचा निरोप सांगितला.
थोडयावेळाने चित्रगुप्त आपली वही आणि डोळ्यावरचा चष्मा सांभाळत आत दाखल झाले.
“हां महाराज बोला कोणाची माहिती हवी आहे?” जांभई देत चीत्रगुप्तांनी विचारले. त्यांची झोप पूर्ण झाली नव्हती हे स्पष्टच दिसत होते.
त्यांच्यासमोर पेपर टाकत इंद्रदेव म्हणाले, “या भांबुर्डेकरची”. चीत्रगुप्तांनी आपली वही चेक केली आणि ते वाचू लागले.
“नाव – भास्कर गोविंद भांबुर्डेकर,
वय – ४६ वर्षे
शिक्षण – MA B.Ed
विवाहित, दोन मुले
उर्वरित आयुष्य – ३५ वर्षे
एकूण पाप – १२५० घटिका
एकूण पुण्य – ४७८२ घटिका
उपभोग्य सुख ……. ”
“ते राहू दे……त्याचा पत्ता तेवढा सांगा.” दरडावणीच्या सुरात इंद्रदेव म्हणाले.

आपल्या जाड भिंगाच्या चष्म्यातून दोन तीन पाने चाळल्यावर चित्रगुप्त म्हणाले.

“पत्ता – भा. गो. भांबुर्डेकर,
K23 universe,
मिल्की वे galaxy,
कृष्णविवर क्र. ५,
पृथ्वी क्र. ४२०,
भारत देश,
महाराष्ट्र राज्य………” चित्रगुप्त पुढे बोलणार तोच त्यांना तोडत इंद्रदेव उद्गारले, “पृथ्वी क्र. ४२० ? या ठीकाणावरून बऱ्याच तक्रारी आल्या आहेत माझ्याकडे…….या ग्रहावरचा मानव आळशी, कामचुकार, असंहिष्ण (सध्याचा चालू ट्रेंड आहे, म्हटलं द्या टाकून) आणि नुसता खादाडखाऊ आहे.” लोडाला टेकून डाव्या हातातल्या रिमोट ने टिव्हीचे चॅनल बदलत आणि उजव्या हाताने समोर ठेवलेल्या डिश मधल्या चिवड्यावर ताव मारत इंद्रदेव म्हणाले, “गेल्या वर्षभरापासुन तर एक एक घटना वाढतच चालल्या आहेत. परवा म्हणे इथे कोण्यातरी एका देशाने दुसऱ्या दुसऱ्या देशावर ब्रम्हास्त्र शक्तीचा प्रयोग केला.”

“होय महाराज पृथ्वीवर त्याला अणुबॉम्ब म्हणतात. अमेरिका नावाच्या देशाने जपान नावाच्या देशावर त्याचा वापर केला होता.” घसरलेला चष्मा उचलून पुन्हा नाकावर ठेवत चित्रगुप्त म्हणाले, “पण ही गोष्ट परवा नाही ७० वर्षांपूर्वी घडली आहे.”
“सत्तर वर्ष?” चेहऱ्यावर आच्छर्याचे भाव आणत इंद्रदेव म्हणाले, “आत्ताच काल परवा ऐकल्यासारखं झालं, म्हटलं २ – ३ दिवसांनी करू न्याय निवाडा आणि देऊयात अपराध्याला शिक्षा. पण ७० वर्षे कधी उलटून गेली कळलंच नाही.”
“होय महाराज, विशेष करून रंभा, मेनका, उर्वशी यांच्या ‘शांततापूर्ण’ सानिध्यामुळे वेळ कसा जातो ते कळतच नाही. नाही का?” प्रधानजींनी बरोबर टोला लगावला.
“बरं बरं ठीक आहे. आत्ता आम्ही आमची चूक सुधारणार. या ४२० पृथ्वीला पुन्हा वठणीवर आणणार. इथल्या मानवाला त्याच्या मर्यादेची आणि आमच्या अमर्याद क्षमतेची जाणीव करून देणार. या मानवांना धडा शिकवण्याची आता गरज निर्माण झाली आहे आणि याची सुरवात या भांबुर्डेकर पासून करणार.”
“पण महाराज …… ” चित्रगुप्त इंद्रदेवांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांच्या कडे पूर्ण दुर्लक्ष करत इंद्रदेव बोलतच राहिले. “अरे समजतो कोण हा भांबुर्डेकर स्वतःला? मी ‘स्वर्गाधिपती’, ‘वज्रधारी’, ‘देवांचा देव’ – इंद्र आणि हा एक मर्त्य मानव. याला धडा शिकवलाच पाहिजे.” भांबुर्डेकरच्या फोटोवर एक तूच्छ कटाक्ष टाकून अखेर इंद्रदेव थांबले.
“पण महाराज एक प्रॉब्लम आहे.” संधी मिळताच चित्रगुप्तांनी आपलं वाक्य पुरं करून घेतलं.
“कसला प्रॉब्लम?”
“तो भांबुर्डेकर पुण्याचा आहे.”
“काय?…. पुण्याचा?” पुण्याचं नाव ऐकताच इंद्रदेव डोक्याला हात लावून खालीच बसले.

 

क्रमशः

<<< मागील भाग           [ भाग १ ]               पुढील भाग >>>

स्वर्गलोकीची PhD – [भाग २]

प्रधानजी सोफ्यावर बसून पत्नीबरोबर ‘जय मल्हार’ पाहण्यात गुंग होते. ते पाहताच इंद्रदेव दारातून ओरडले “प्रधानजी”.
“आयला…. या खंडोबाचा आवाज पण आपल्या इंद्रासारखाच वाटतोय.” समोरच्या डिशमधला चिवडा तोंडात टाकत प्रधानजी बायकोला म्हणाले. आपल्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याचं ऐकूनही न ऐकल्यासारखं करत (नाय तरी काय करणार वो…जिथं- तिथं हीच परिस्थिती) त्यांनी पुन्हा एकदा आवाज दिला “प्रधानजी”.
या वेळेस प्रधानजींना थोडी शंका आली. मालिकेतून ही हाक येणे शक्य नव्हते, कारण टीव्हीत तर जाहिरात लागली होती.

त्यांनी मागे वळून पाहीले तर साक्षात इंद्रदेव, एका हातात (बऱ्यापैकी गंजलेली) तलवार घेऊन, आत्ताच टीव्हीत बघितलेल्या खंडोबासारखी ‘पोझ’ घेण्याचा प्रयत्न करत दारात उभे. ते पाहताच प्रधानजी लगबगीने उठले आणि देवांच्या स्वागतासाठी दारात आले.

दारात येताच प्रधानजी अजीजीने म्हणाले “या या. अहो भाग्य आमचे, आपल्या पायाची धूळ आमच्या घराला लागली”.
प्रधानजींना खरंतर “कित्ती घाण पाय आहेत, धुऊन येता येत नाही का?” असं सुचवायचं होतं, पण त्यांच्या बोलण्यातला तो ‘टोन’ न समजल्यामुळे इंद्रदेव बिनधास्त आपल्या पाउलखुणा उठवत आतमध्ये आले.

आतमध्ये आल्याबरोबर त्यांच्यासमोर पेपर टाकत ते म्हणाले, “हे वाचा……… काय एक एक डोक्याला ताप आहे बघा.”
पेपर हातात घेत प्रधानजी वाचू लागले.

               आजपासून सुरा वर २०% अधिक कर द्यावा लागणार

“खरच महाराज ……. मोठ्ठाच ताप आहे हो हा” अतिशय चिंतीत नजरेने इंद्रदेवांकडे पाहत प्रधानजी म्हणाले.
“अहो प्रधानजी काय वाचताय तुम्ही? हा मुख्य मथळा वाचा.” त्या मथळ्यावर बोट ठेवत इंद्रदेव म्हणाले.

                      देवालाही सर्व काही शक्य नाही
               – पृथ्वीवरील मर्त्य प्रा. भांबुर्डेकर यांचे वक्त्यव्य

“कोण आहे कोण हा भांबुर्डेकर?” त्याच्या फोटोकडे नीट निरखून पाहत प्रधानजी म्हणाले.
“तेच विचारण्यासाठी मी इथं आलोय.” सोफ्यावर बसकण मारून आपली ‘पायधूळ’ झाडत इंद्रदेव म्हणाले, “या भांबुर्डेकराचा पत्ता लावा, त्याचं अकाउंट चेक करा. मला आत्ताच्या आत्ता त्याची सर्व माहिती हवी आहे.”

प्रधानजी लगोलग आतमध्ये गेले आणि आपला Apple चा MacBook Pro Laptop घेऊन बाहेर आले. बराच वेळ उंदीर (आता mouse ला मराठीत काय म्हणायचं???) इकडे तिकडे फिरवून त्यांनी काही वेबसाईट चेक केल्या. आणि एका वेबसाईट वर स्थिर होत ते म्हणाले, “हा सापडली माहिती.”
“हं सांगा.” नखं कुरतडत इंद्रदेव म्हणाले.

प्रधानजी वाचु लागले

“नाव- भा. गो. भांबुर्डेकर,
Birth Date – 29/2/1970

Gender – male

Relationship Status – Married

Interested in – women

Friends – 680

Mutual Friends – 12

“अहो प्रधानजी काय वाचताय तुम्ही?” – इंद्रदेव

“भांबुर्डेकरची माहिती. तुम्हीच सांगितले ना त्याचं अकाउंट चेक करा म्हणून.”

“अहो म्हणून काय तुम्ही त्याचं फेसबुकचं अकाउंट चेक करणार काय? आपलं पाप – पुण्याचं अकाउंट चेक करा” पुन्हा टीव्हीकडे पाहत त्यांनी हुकुम सोडला.

क्रमश:

<<< मागील भाग                          पुढील भाग >>>

स्वर्गलोकीची PhD – [भाग १]

‘Times of Heaven’ची घडी काखेत घेऊन पवन देवता घाई घाईने इंद्रदेवांच्या कक्षाकडे निघाले होते. त्यांचा चेहरा घामाघूम झाला होता, तहानेने गळा अगदी सुकला होता पण इंद्रदेवांपर्यंत ही बातमी पोहोचवणं अतिशय आवश्यक होतं. हाश-हुश करत ते एकदाचं दरवाजापर्यंत पोहोचले. दरवाजा उघडाच होता. दारावरचा पहारेकरी भरदिवसा झोपा काढत होता.

पवन देवता आतमध्ये शिरले. महालात इंद्रदेव त्यांच्या काही निवडक मंत्र्यांबरोबर ‘बाहुबली’ बघत होते. त्यांचासमोर उभे राहत पवन देवता म्हणाले, “महाराज, हे पाहा मी काय बातमी आणलीये ती.”
इंद्रदेव मान वाकडी करून क्लायमॅक्सचा सीन पाहण्यात गुंग होते. त्यांचे लक्ष नसल्याचे पाहुन पवनदेवता पुन्हा म्हणाले, “महाराज, हे पाहा आजच्या वृत्तपत्रामध्ये काय छापुन आलय ते.”
त्यांच्या बोलण्याने डिस्टर्ब झालेले इंद्रदेव त्रासिक चेहरा करून म्हणाले, “काय पवनदेव, तुम्हाला पण क्लायमॅक्सच्याच वेळेला कडमडायचं होतं?”
“महाराज क्लायमॅक्स सोडा. हे पाहा काय छापुन आलय ते.” असे म्हणत त्यांनी पेपरची घडी इंद्रदेवाच्या हातात दिली.

इंद्रदेवांनी पेपर हातात घेतला. पेपरचं नाव होतं ‘Times of Heaven’ नाव वाचताच त्यांनी तो पेपर वरुण देवांसमोर धरला आणि म्हणाले, “वाचा.”
“महाराज, मला बी इंग्रजी वाचता येत न्हाय.” बंडीतुन बाहेर डोकावणारे पोट खाजवत वरुणदेव म्हणाले.
“मुर्खा, मला बी येत न्हाय म्हणजे काय?”,चवताळून इंद्रदेव ओरडले, “अरे मी B.A. English आहे.”

इंद्रदेवांची नेहमीचीच गोची झाल्याची पाहुन पवन देवतांनी मागच्या खिशातून ‘दैनिक स्वर्गलोकची’ आवृत्ती काढली आणि म्हणाले, “महाराज यातली बातमी वाचा.”
“मग ही अगोदर नाही देता आली तुम्हाला?” पवनदेवतांवर डाफरत इंद्रादेवांनी पेपर हातात घेतला आणि ते मुख्य मथळा वाचु लागले.

                                    देवालाही सर्व काही शक्य नाही
                           – पृथ्वीवरील मर्त्य प्रा. भांबुर्डेकर यांचे वक्त्यव्य

“काय?…देवालाही सर्व काही शक्य नाही??……अरे ही मर्त्य माणसे समजतात काय स्वतःला?…….देवांच्या शक्तीबद्दल बोलण्याची हिम्मतच कशी झाली यांची?” मथळा वाचून इंद्रदेव भडकलेच. “यांचा बंदोबस्त करायलाच हवा” असे म्हणत इंद्रदेव झपा झपा पावले टाकत राजदरबारात आले.

राजदरबार नेहमीप्रमाणे रिकामा होता. रिकामाच असणार. गेल्या कित्येक वर्षांपासुन तो रिकामाच होता. यापूर्वी राजदरबार कधी भरवला होता याची पुसटशीही आठवण कोणाला नव्हती.

चीत्रगुप्तांच्या नोंदवहीप्रमाणे इसवी सन पुर्व २७०० वर्षी पाताळातील राक्षस ‘कैटभासुर’ याने स्वर्गलोकावर हल्ला करण्याचे ठरवले होते, त्यावेळेस “कुठे पळून जावे?” या विषयावर चर्चा करण्यासाठी राजदरबार भरवला गेला अशी नोंद होती.

सुदैवाने त्या आक्रमणाआधीच कैटभासुरचं लग्न झालं – बिच्चारा! आत्ता स्वयंपाक, भांडी, कपडे आणि संध्याकाळी बायकोबरोबर खरेदी यातून त्याला वेळच मिळत नाही तर आक्रमण कधी करणार. यामुळेच स्वर्गलोक बचावला. ( स्वर्गलोकाची नकळत का होईना पण संरक्षण केल्याबद्दल, कैटभासुरच्या पत्नीला इंद्रदेवांनी नंतर साडी-चोळी चा आहेर पाठवला असं ऐकिवात आहे.)

तर… त्यावेळेस नंतर आजतागायत कधी दरबार भरला नव्हता. तसं म्हणायला १९६९साली राजदरबार भरला असल्याची एक पुसटशी नोंद होती. ‘मर्त्यभूमीवरून’ (म्हणजेच पृथ्वीवरून हो!! ) मधुबाला नावाच्या एका अभिनेत्रीचे स्वर्गात आगमण झालं, त्यावेळेस तिच्या ‘जब प्यार किया तो डरना क्या’ या गाण्याची स्वर्गाच्या मंत्र्यांनी केलेली फर्माइश पूर्ण करण्यासाठी तो दरबार भरवला गेला होता. पण शचीला (इंद्रदेवांची पत्नी) याची थोडी जरी खबर लागली तर ……… (विवाहित पुरुषांना या ‘तर…’  चा अर्थ चांगलाच माहित आहे. म्हणून पुढील विवरण देण्याचे टाळले आहे) म्हणून इंद्रदेवांनी ती नोंद मिटवायला सांगितली.

असो. तर इंद्रदेव दरबारात आले, दरबारात कोणीही नाही हे पाहून ते तडक प्रधानजींच्या महालात गेले.

क्रमश :

पुढील भाग >>>

ओळीमधला एक व्यक्ती – [भाग ३/३]

घरी पोहोचताच नातीने घाई घाईने खोक्यातून केक बाहेर काढला आणि व्हीलचेअरवर बसलेल्या आपल्या आजोबांसमोर तो केक धरत ती म्हणाली, “हॅप्पी बर्थ डे आजोबा”.
“अरे व्वा. माझ्यासाठी आणलास शोन्या तू”. असं म्हणत त्यांनी तिचा पापा घेतला.
“मी नाही घेतला. सुपर मार्केटमधल्या एका अंकलने घेऊन दिला”. असे म्हणत तिने सुपर मार्केट मधली हकीकत आजोबांना सांगितली आणि ती चिट्ठी त्यांच्या हातात दिली.

आजोबांनी चिट्ठी उघडली. त्यात फक्त तीन  ओळी लिहिल्या होत्या.

           एखाद्याच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण करायचा प्रयत्न कर,
               त्यातून निर्माण होणारे तरंग एक दिवस तुझ्यापर्यंत नक्की पोहोचतील.
                                                                         – ओळीमधला एक व्यक्ती

चिठ्ठी वाचताच आजोबांचे डोळे भरून आले. दोघींनाही समजेना काय झाल ते.
आज्जीने  विचारले,”अहो….काय झालं?”.
डोळ्याच्या कडा हलक्याश्या पुसत आजोबा म्हणाले,
“वीस एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा मी एका दुकानात गेलो होतो त्यावेळेस माझ्या पुढे उभा असलेल्या एका मुलाला त्याच्या वाढ दिवसाचा केक विकत घ्यायचा होता. पण त्याच्या आईकडे पुरेसे पैसे नव्हते. त्या मुलाचा पडलेला चेहरा मला पाहवेना म्हणून मी त्याला तो केक विकत घेऊन दिला. त्यांनी मला माझं नाव आणि पत्ता लिहून मागितला. तेव्हा मी एक चिट्ठी लिहून त्या मुलाच्या हातात दिली.”

“काय लिहिलं होतं त्यात?” आज्जीने उत्सुकतेने विचारले.

हातातली चिट्ठी तिच्या हातात देत आजोबा म्हणाले, “एखाद्याच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण करायचा प्रयत्न कर, त्यातून निर्माण होणारे तरंग एक दिवस तुझ्यापर्यंत नक्की पोहोचतील. ओळीमधला एक व्यक्ती.”

          -समाप्त-

                                                                        (एका कोरियन जाहिरातीवर आधारित )

<<<[भाग १]   [भाग २]

ओळीमधला एक व्यक्ती – [भाग २/३]

‛370’ चा आकडा पाहताच तीचा सगळा आनंद मावळला. या वेळेसही केक नाही हे कळातच नातीचे डोळे भरून आले. आज्जीला तिचा रडवेला चेहेरा पाहवेना. तिने नातीला समजावण्याचा प्रयत्न केला पण तिचं काहीएक ऐकून न घेता ती ओरडली.

” … पण आज वाढदिवस आहे ना… मग केक नको?”
“शोन्या आपण पुढच्या वेळेस नक्की घेऊ.”
“मागच्या वेळेस पण तु अशीच म्हणाली होतीस.”

आज्जीला काय बोलावे ते सुचेना. काय बोलणार? गेल्या दोन महिन्यांपासून नात या दिवसाची तयारी करतेय. बर्थडे च्या दिवशी काय काय करायचे याचा प्लॅन तीने दोन महिन्यांपूर्वीच तयार केला होता. आणि आत्ता हा सगळा प्लॅन फेल होणार होता. पण आज्जी तरी काय करणार, तिच्या कडे दुसरा पर्यायपण नव्हता.
“बाळा वाढदिवसाला केक कापावाच लागतो असे काही नसते………आपण घरीच काहीतरी करु ……. तुला ते चॉकलेट पाहिजेना चल आपण घेउ.” तिने नातीला समजावण्याचा हर तऱ्हेने प्रयत्न केला पण नातीचे कशानेच समाधान होईना. तशीच कशीतरी समजूत काढून ती नातीला घेऊन सुपरमार्केटच्या बाहेर पडली.

बिलिंग काउंटरच्या त्या ओळीत नातीच्या मागे एक तरुण उभा होता. आज्जी आणि नातीचा केकचा हा सर्व खेळ त्याने पहिला होता.
सामानाचं बिल झाल्यावर तिथेच टेबलावर ठेवलेला तो केक त्याने उचलला आणि त्याचेही बिल करण्यास सांगितले. सगळ्या वस्तू घेवून तो घाई – घाईने बाहेर आला.

बाहेर रस्त्यावर आज्जी नातीला घेऊन रिक्षासाठी थांबली होती. नात अजूनही हुंदके देऊन रडत होती.
तिच्या समोर तो केक धरत तो तरुण म्हणाल,” हे घे माझ्यातर्फे तुला गिफ्ट”.
केक पाहताच नातीचे डोळे आनंदाने चमकले. पण आज्जी त्या तरुणाला म्हणाली.
“माफ करा मी हा केक नाही स्वीकारू शकत”.

“का?”, त्याने थोडेसे आश्चर्याने विचारले.
“तिला अशी सवय लागु नये म्हणून”.
“तुम्ही काय म्हणताय ते मला कळलं नाही” – तरुण.

“पुढे आयुष्यात अश्या अनेक अडचणी येतील त्यावेळेस त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी कदाचित ती अशीच कुणाच्यातरी मदतीची वाट पाहत बसेल. आणि तिच्यावर असे संस्कार होऊ नये म्हणून मी हा केक नाही घेऊ शकत. प्लिज तुम्ही राग मानू नका”.

आज्जीचं बोलणं ऐकूण तो तरुणही दोन क्षण थांबला पण लगेचच तो म्हणाला,
“ही मदत नाहीये, हे तर फक्त आनंदाचे फक्त काही क्षण आहेत जे मी आजपर्यंत कुणाला देऊ नाही शकलो.”
“म्हणजे?” काहीच बोध न झाल्याने आज्जीने विचारले

“आज जसा तुम्ही हिला स्वावलंबनाचा धडा देत आहात तसाच एक धडा मला माझ्या लहानपणी मिळाला होता”.
त्याच्या बोलण्यातून अजूनही काहीच उलगडा होत नव्हता पण आज्जीची उत्सुकता मात्र वाढली होती.

तो सांगू लागला, “मी तेव्हा 8 वर्षांचा होतो, माझ्या वाढदिवसाचा केक घेण्यासाठी मी आई बरोबर एका दुकानात गेलो होतो. पण त्यावेळेस आईकडे पुरेसे पैसे नव्हते त्यावेळेस माझ्या मागे उभे असलेल्या एका व्यक्तीने त्याचे स्वतःचे सामान न घेता मला त्या पैशातुन केक विकत घेऊन दिला आणि सांगितले कि मोठा झाल्यावर जर तुला कधी कोणाची मदत करायची संधी मिळाली तर ती तू सोडू नकोस, ज्यावेळेस तू कोणाचीतरी मदत करशील त्यावेळेस मला माझे पैसे परत मिळाले असे समज”.

आपल्या पाणीदार डोळ्याने आज्जीकडे पाहत तो म्हणाला “आज त्या व्यक्तीचे आभार मानायची संधी मला मिळाली आहे तरी कृपा करून तुम्ही हा केक घ्या”.

तरुणाचे बोलणे ऐकून आज्जी भारावुन गेली तिने केक घेतला पण तरीदेखील असे विनामोबद्दला तो केक घेणे तिच्या मनाला पटेना. तिने त्या तरुणाला त्याचे पैसे परत करण्याच्या हेतूने त्याचं नाव आणि पत्ता मागितला. त्या तरुणाने एका कागदावर नाव आणि पत्ता लिहून ती चिट्ठी नातीच्या हातात दिली. ती चिट्ठी आणि केक घेऊन नात उड्या मारतच घरी पोहोचली.

क्रमशः

<<<[भाग १]                [भाग ३]>>>

ओळीमधला एक व्यक्ती – [भाग १/३]

“आज्जी चॉकलेट?”,

सामानाची ट्रॉली घेऊन चॉकलेटच्या रॅक पाशी थांबलेल्या आपल्या सात वर्षांच्या नातीचा प्रश्न ऐकून आज्जी क्षणभर थबकली. पण लगेचच स्वत:ला सावरत ती म्हणाली,
“नको बाळा, चॉकलेटने दात खराब होतात.”

मेनरोडवरच्या त्या सुपरमार्केट मधला आज्जी आणी नातीचा हा ठरलेला संवाद. दरवेळी नात चॉकलेटची
मागणी करत आणी दरवेळी आज्जी ठरलेलं उत्तर देत.
चॉकलेट मिळालं नाही म्हणून नात खट्टू झाली पण थोड्याच् वेळात हसत-बागडत आणी पुन्हा आपल्या विश्वात दंग होऊन ती आज्जीच्या मागे – मागे ट्रॉली ढकलत जाऊ लागली.

शक्य असेल त्यावेळेस आज्जी न मगताच तिला चॉकलेट घेऊन देईल हे तिला ठावुक होते. त्यामुळे हट्ट करण्याची गरजच नव्हती. बाबा गेल्यानंतर आणी आजोबा व्हीलचेअरवर बसल्यापासून आज्जीला किती कष्ट घ्यावे लागत आहे हे ती पाहतच होती, त्यामुळे ति कधी हट्ट करत नसे. आत्ताही तिने फक्त मागून पाहिले. ‘मिळालं तर मिळालं’.

यादीतील एक-एक सामान गोळा करण्यात आज्जी गुंग होती, तर ट्रॉलीत बसलेल्या ‛प्रवाशांना’ त्यांच्या ‘गंतव्य’ स्थानपर्यंत पोहचवण्यात नात दंग होती.
सुपर मार्केट मधल्या त्या गुळगुळीत ‘रस्त्यावरुन’ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ‛वाहनांना’ चुकवत आणी सामानाच्या ‘बिल्डिंगांमधुन’ रस्ता शोधत ती ट्रॉलीची गाड़ी चालवायला तिला खुप आवडायचं. सुपरमार्केट आवडण्याचं हे तिचं दुसरं महत्वाचं कारण.
“पहिलं?” अर्थातच – ‘चॉकलेट’.

प्रत्येक वस्तु घेताना आज्जी त्याचं बारीक निरीक्षण करी. चार – चार वेळा वर- खाली फिरवुन व्यवस्थित वाचून – बघुन मगच ती वस्तु घेत.
खरेदीच्या बाबतीत तीचा एक साधा आणी सरळ फॉर्म्युला होता. चव, वास, रंग, क्वालिटी, ब्रॅण्ड असल्या गोष्टींकडे साफ दुर्लक्ष करून ती फक्त एकच गोष्ट चेक करायची – ‛किंमत’.
सगळं सामान तिला 2000 रूपयांमधे बसवयाचे होते त्यामुळे स्वस्तातले स्वस्त सामानच निवडणे तिला भाग होते.

अश्याच ‛स्वस्त’ प्रवाशांनी नातीची गाड़ी पूर्ण भरली होती आणी आता ती गाड़ी तिच्या अखेरच्या स्टॉपवर पोहोचली होती – ‛बिलिंग काउंटरच्या’.
काउंटरवरच्या मुलीने त्या ट्रॉलीतले सामान टेबलावर ओतलं आणी बारकोड रीडरने प्रत्येक वस्तुचे बिल करू लागली.
“1940 रूपये”, कॅरीबॅग मध्ये सामान भरत ती मुलगी म्हणाली
आज्जीने पर्समधल्या हजार हजारच्या दोन नोटा तिच्या हातावर टेकवल्या आणी ती कॅरीबॅग नातीच्या हातात दिली. यादीतल्या सामानाचा आणी पर्समधल्या पैशांचा योग्य मेळ बसवल्यामुळे ती स्वतःवरच खुश झाली.
सामानाची पिशवी हातात पडताच नातीने सम्पूर्ण पिशवी धुंडाळुन काढली पण तिला अपेक्षित असलेली गोष्ट त्यात दिसलीच नाही. तिने चमकुन आज्जीकडे पाहिले आणी म्हणाली,
“केक?”
‛केक’ हा शब्द ऐकताच आज्जीचं तोंड बारीक झालं. इथं येऊ पर्यन्त नातीने सारखा केकचाच धोशा लावला होता. तरी शेवटी केक घ्यायचा राहुनच गेला. याचं तिला आच्छर्य वाटलं.
तीने पर्स उघडून पाहीले त्यात अवघे 105 रुपये शिल्लक होते. त्यातले 30 रुपये रिक्षाला जाणार. राहीले 75 रुपये.
‛आत्ता काय करायचं’ ती विचारात पडली. गेल्या दोन महिन्यापासून नात या दिवसाची वाट बघतेय, केक घेऊन देणं तर भागच होतं.

75 रुपयांमध्ये काही मिळतेय का ते पाहण्यासाठी ती केकच्या रॅक पाशी गेली. प्रत्येक केक समोर त्याच्या किमतीचे लेबल लटकत होते. Rs 220, Rs 240, Rs 345, Rs 460, Rs 550……
लेबल वाचून तिला धडकीच भरली.
“आत्ता नातीला काय सांगणार?” या विचाराने हताश होऊन ती खाली बसली तेवढ्यात कोपऱ्यातल्या एका केकवर तिची नजर गेली त्यावरची किंमत पाहून तीचा विश्वासच बसेना – “70 रुपये”. केक पाहून तीला प्रचंड आनंद झाला. केक घेऊन ती घाई – घाईने काउंटरपाशी आली. काउंटर वरच्या मुलीच्या हातात तो केक देऊन तीने 70 रुपये पुढे केले.
तिच्या हातातल्या पैशांकडे पाहून ती मुलगी चपापली एक क्षण तिने आज्जीच्या तोंडाकडे पाहिले आणी दुमडलं गेलेलं लेबल उघडून दाखवत ती म्हणाली, “मॅडम हा केक 370 रुपयांचा आहे”.

क्रमश:

[ भाग २ ]>>>